ही कहाणी आहे अरण्यातल्या लॉकडाऊनची. जगाची उलथापालथ करून सोडणाऱ्या कोरोनाने शहरं जागीच गोठवली. पैसा आणि प्रगतीमागे धावणाऱ्या गतिमान माणसाच्या नाड्या आवळल्या. माणसाचा स्पर्शावरचा विश्वास फक्त उडवला नाही तर उध्वस्तही केला. निसर्गापासून माणसाने दूर जाऊ नये वगैरे चर्चांना वेग दिला पण ही कहाणी तुम्हाला त्या माणसांना भेटवते जी मुळातच निसर्गात राहतात; झाडं वेली पशु पक्षी आजही ज्यांच्या संस्कृतीचा भाग आहेत, त्या माणसांनादेखील लॉकडाऊनचे दिवस पाहावे लागलेत. हे कोरोना नावाचे गारुड एका जंगलात नेमकी कोणती उलथापालथ करते, धड रस्ताही नसलेल्या त्यांच्या जंगलवाटांनी पोलीस कसे पोहोचू शकले, डोळ्यात हिरवी स्वप्न घेऊन वादळवाऱ्याला भिडणाऱ्या अरण्यावासींना या कोरोनाच्या भयाने काय म्हणून वेठीस धरले याची कल्पनेपल्याड सुंदर सफर घडवणारी “कोरोण्यकांड” ही विशेष कादंबरी!
Novelette म्हणजेच लघुकादंबरी हा प्रायोगिक लेखनाचा वेगळा प्रकार हाताळणारी, शब्दसामर्थ्याने अघळपघळ मांडणीला छेद देणारी, निसर्गाच्या ताज्या भाषेत शहरीकरणाची विराणी मांडणारी ही अरण्यगाथा होय. कोरोनाचे पडसाद जगभर उमटत असता मराठी लेखणीतून वाचकांसमोर येणारी आणि लॉकडाऊनचे वास्तव मांडणारी कदाचित ही पहिलीच कादंबरी ठरेल.
मूळ मराठी कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर सातच महिन्यात हिन्दी भाषांतराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि देश विदेशातील मराठी आणि हिन्दी कानाकोपऱ्यांतील वाचकांच्या प्रेमास ती पात्र ठरतेय.