तिच्या लेखनप्रवासात तिला नेहमीच त्याची साथ-सोबत राहिली. तिने लेखणी हातात घेतली तेव्हा सरस्वतीच्या दरबारातही इतका भ्रष्टाचार असेल हे तिला अपेक्षित नव्हतं. संकटं येत राहिली. हेवे- दावे, दुष्ट प्रवृत्ती, आर्थिक गणितं, संसारातल्या अडचणी, अचानक सुटलेला मैत्रीचा हात अशा असंख्य अडचणींवर मात ती करू शकली ती त्याच्या भक्कम आधारामुळेच.
यशाने हुरळून न जाता, अपयशाने खचून न जाता ती मार्गक्रमण करत राहिली. तिचं कौतुक करायला, तिचे अश्रू पुसायला तो असायचाच बाजूला. त्याने तिला भव्य-दिव्य स्वप्नं पाहायला शिकवलं. त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी जीवतोड मेहनत करायला शिकवलं. निग्रहाने पावलं टाकत राहिलं तर दूरचा पल्ला गाठता येतो हा विश्वास त्याने तिच्यात निर्माण केला. बालपणीच्या संस्कारांची शिदोरी तिला अपप्रवृत्तींपासून दूर ठेवत राहिली आणि मोठी झेप घेण्यासाठी तो तिला मानसिक बळ देत राहिला. तिच्यासाठी अथक परिश्रम घेत राहिला. त्याच्या आर्थिक पाठबळावर तर तिला निर्भयपणे वाटचाल करता आली, नाहीतर कदाचित पहिलं पाऊल टाकण्यापासूनही ती वंचित राहिली असती.
अद्वैत म्हणजे तरी दुसरं काय असू शकतं?