हास्य प्रवास पुस्तक माझ्या थायलँड प्रवासाचे वर्णन असले तरी ही एक सरमिसळ कथा आहे. काही पात्र काल्पनिक आहेत,तर काही खरी असली तरी त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.या कथेत मालवणचा निळाशार समुद्रकिनारा आहे,तांबडी माती आहे आणि त्या मातीत पिकलेले रानमेव्यासारखे एक पात्र देखील आहे.त्या पात्राचे मालवणी संवाद अचूक लिहिण्यासाठी मला माझ्या मातोश्री, सौ. मनिषा प्रवीण सोनवडेकर यांनी मदत केली. या पुस्तकात कोल्हापूरचा तांबडा-पांढरा आहे आणि कोल्हापुरी मातीशी नाळ जोडलेला एक पैलवान मर्द गडीदेखील आहे. हे पुस्तक वाचताना आयुष्यात असणारे ताणेबाणे विसरून वाचकांच्या मुखावर हास्याचे कारंजे फुटावे, ही इच्छा मनी ठेवून हे पुस्तक लिहिले आणि ह्या पुस्तकाला 'हास्य प्रवास' असे नाव दिले.ह्या कथेत पंधरा मुख्य पात्रे आहेत,थायलँड प्रवासादरम्यान होणाऱ्या त्यांच्या गमती जमती वाचताना तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य खुलेल.कथेसोबत, मी केलेल्या अनेक प्रवासादरम्यानचे विनोदी किस्से,अनुभव,इतर देशातील संस्कृती, एखाद्या ठिकाणाचे देखणेपण अशा अनेक गोष्टींच्या व्यंजनांचा मी घातलेला घाट म्हणजेच 'हास्य प्रवास'.खरंतर,मराठी साहित्यात प्रवास वर्णनावर अनेक पुस्तके लिहिली गेली.त्यातली बरीच गाजली देखील..; पण मला मात्र काहीतरी वेगळे लिहिण्याची फार इच्छा होती.मला परदेशवारीत माझा महाराष्ट्र दाखवायचा होता. विविध संस्कृतीने लहडलेला..अनेक भाषा, चालीरीती आणि संस्कारांनी नटलेला माझा महाराष्ट्र ! बाहेरून नारळासारखा टणक पण खोबऱ्यासारख्या मनाने रसरसलेल्या माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांबद्दल या कथेत मला मुक्तहस्ताने लिहायचे होते.’हास्य प्रवास’ ही कथा मी माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला अर्पण करीत आहे.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners