डॉक्टर प्रताप मधुकर उर्फ अमृतानंद हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. गेली दहा वर्षे परदेशातील आपत्कालीन वैद्यक, इमर्जंसी मेडिसिन या विभागात एका हॉस्पिटल मध्ये सेवा देता आहेत . मूळच्या मुंबईच्या अमृतानंद याना सुरवातीपासूनच अध्यात्मात रस होता . ३३ वर्षांच्या देशातल्या व परदेशातल्या प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवाने त्यांना समृद्ध केले. हजारो पेशंट्स, नातेवाईक, कुटुंबे, यांचे जीवन, त्यातील सुख दुःख जवळून पाहण्याची संधी त्यांना या व्यवसायाने दिली . त्यातून त्यांना अध्यात्मिक विषयांचा अभ्यास करण्याची आवड उत्पन्न झाली . वैद्यकीय ज्ञान ,मानसशास्त्र याच्याशी अध्यात्माची सांगड घातली तर मानवी जीवनातल्या अनेक प्रश्नाची उत्तरे मिळतात . तरुण पिढी या ज्ञानाने आयुष्यात यशस्वी होते असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
आयुष्यभर शास्त्रीय दृष्टिकोनातून ते जीवनाकडे बघत आले . वैद्यकशा स्त्र, मानसशास्त्र याच्या आधारे मानवी जीवनाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. पुढे फार उशिरा भगवद्गीतेशी संबंध आला. त्यातल्या अर्जुनात ते स्वतःला पाहत होते व श्रीकृष्णाच्या ठिकाणी त्यांना एक समुपदेशक ,कॉऊन्सेलर दिसत होता . पण हा श्रीकृष्ण बाहेरच्या जगात शरीररुपाने नव्हता तो त्यांच्याच आत विवेकशील मेंदूच्या रूपाने उपदेश करत होता. त्याचा उपदेश मानस शास्त्रातल्या विवेकनिष्ठ उपचार पद्धतीसारखा होता .जणू त्यांचा विवेकी मेंदू, भावनिक मेंदूशी बोलत होता, समुपदेशन करत होता.
स्वतःमध्ये बदल घडवल्याशिवाय परिस्थिती बदलता येत नाही व हा बदल घडवण्याचे एक शास्त्र, एक प्रक्रिया आहे, नुसते अध्यात्मिक लेक्चर ऐकून हे होत नाही, हे त्यांना श्रीमद भगवद गीतेच्या अभ्यासाने समजलं.
याच स्वयं प्रेरणेतून निर्माण झाली ही मातृगीता.