विविध भाजीपाला पिकावर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव नियमित आढळून येतो, तर काही किडी ठराविक हंगामात आढळून येतात. परंतु सध्या अनेक भाजीपाला पिके बिगरहंगामी व वर्षभर घेतली जात असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. रासायनिक कीटकनाशकाचा अविवेकी व अतिरिक्त वापरामुळे अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागत आहे. अलीकडील काळात हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. त्यामुळे किडीच्या प्रादुर्भावावर, मित्र कीटकावर आणि कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीवर त्याचा परिणाम होत आहे. दुय्यम किडी प्रमुख किडी म्हणून सामोऱ्या येत आहेत आणि नवीन किडीचा प्रादुर्भावदेखील आढळून येत आहे. कोणत्याही किडीच्या व्यवस्थापनासाठी किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार, जीवनक्रम व व्यवस्थापनाच्या विविध पद्धती या बाबीची माहिती असणे आवश्यक आहे. सदरील पुस्तकामध्ये विविध भाजीपाला पिकावरील वेगवेगळ्या किडींची सविस्तर माहिती दिली आहे.