या बाल-कुमार कवितासंग्रहातील मुलांचं भावविश्व घरात-बाहेर वावरता-वावरता अनुभवसंपन्न होत जाताना दिसतं. घरातल्या सर्वांबरोबर त्यांचं जिव्हाळ्याचं, प्रेमाचं नातं आहे; तसंच बाहेरच्या जगात त्यांना दिसलेली गरीबी, भूकही त्यांना अस्वस्थ करते. त्या मुलांचं दुःख दूर करण्याची इच्छा त्यांच्या मनात जागी होते. शहाण्या मुलांबरोबरच काही वेडी मुलंही या कवितांमधे आहेत आणि या मुलांना शहाणं करण्यासाठी प्रयत्नशील अशा कविताही या संग्रहात आहेत. काही संवादात्मक कथा-कविताही आहेत, ज्या मुलांवर संस्कार करता-करता त्यांचं मनोरंजनही करतात. ह्या कविता मुलांना खूप आवडतील असा विश्वास वाटतो.