एक परी आपले आकाशातले गाव सोडून पृथ्वीवर काही दिवसांसाठी वास्तव्यास येते. ती इथे येतेच मुळी आनंद वाटण्यासाठी. इथे ज्याच्या ज्याच्या सहवासात येते त्या प्रत्येकाला लळा लावते, स्नेहाचा-अगत्याचा वर्षाव करते. आपले इथले वास्तव्य खूप समरसून जगते. नवी कलाकौशल्य आत्मसात करते, नृत्य शिकते, चित्र काढायला लागते, लिहायला लागते, खूप वाचन करते, मनसोक्त भटकंती करते, बेकिंग करायला शिकते, जे स्वतः शिकले ते छोट्या मुलांना शिकवायची स्वप्न पाहते. मात्र दुर्दैवानं तिची परत जायची वेळ येताच स्वतःच चितारलेलं चित्र अर्ध्यावर सोडून निघून जाते... आणि इथे मात्र ज्या सर्वांसोबत धागे गुंफून जाते त्या सगळ्यांना दुःखाच्या सागरात बुडवून जाते...
ही एका परीची वाटणारी कथा आमच्या प्राचीची कथा आहे... ती अशीच होती... जेवढं जगली तेवढं आयुष्य समृद्धपणे जगली. तिच्या असण्याची एक स्वतःची ओळख होती...आज तिचे नसणे हीसुद्धा तिचीच एक नवी ओळख आहे...
हे पुस्तक फक्त प्राचीचे असले तरी फक्त प्राचीचे नाही... जगण्याच्या शाश्वत मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या तरीही क्षणभंगुरतेची जाणीव असणाऱ्या सगळ्यांचे आहे...
प्राची कुलकर्णी नावाच्या एका अफाट आणि स्वच्छंद व्यक्तिमत्वाचा हा एक परिचय...