* विनाकारण ऐकू येणार्या आवाजांमुळे तुम्ही त्रस्त झाला आहात काय?
* वाहनांच्या आवाजामुळे तुमची चिडचिड होते काय?
* रात्रपाळी (नाईट शिफ्ट) मुळे व दिवसा आवाज येत असल्याने तुमची झोपमोड होते काय?
* अलिकडे चिडचिड, राग, क्रोध, त्रास, वैताग, उपद्रव, नैराश्य असे होऊ लागले आहे काय?
* तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होत आहे काय?
* कारखान्यांमध्ये ध्वनी प्रदूषणाविषयी काय काय उपाययोजना हव्यात?
असे असल्यास तुम्हाला ध्वनी प्रदूषणामुळे हा त्रास होऊ शकतो.
या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.
वातावरणातील जल, वायू इत्यादी प्रदूषणाबाबत बोलले जाते, ध्वनी प्रदूषण,आवाज याला आपण हलक्यात घेत असतो. मोबाइलवरील स्पिकरवर आवाज वाढवणार्याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कान आपण बंद करू शकत नाही. काही आवाज बळजबरी आपल्याला ऐकावे लागतात. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते.
अवाजवी आवाजाचा ध्वनी जेव्हा हानिकारण पातळीवर पोहोचतो तेव्हा सजीवांवर न दिसणारे नुकसान झालेले असते. ध्वनी प्रदूषणाने मानव प्राणी तसेच इतर सजीवांत अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.
वाहनांमुळे होणार्या ध्वनी प्रदूषणावर स्वतंत्र प्रकरण लिहिले असल्याने वाचकांना ते सुद्धा मार्गदर्शक ठरावे.
एकूणच ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करणारे हे पुस्तक वाचकांना पर्यावरणाबाबतच्या एका दुर्लक्षिलेल्या समस्येविषयी ओळख करून देते हे नक्की.