"नाटक लिहिणं ही माझी कित्येक वर्षापासूनची इच्छा. तसं मी माझ्या शालेय जीवनात अनेक छोट्या-छोट्या कार्यक्रमात सहज सहभागी होत असायचो. कवितावाचन, वक्तृत्व स्पर्धा असो, की छोट्या नाटिका असो.. सर्व स्पर्धेत मी हिरीरीने सहभागी होत असायचो. पण, पुढे कॉलेजात गेल्यावर मला कधीच एकांकिका/नाटक करणं जमलं नाही किंवा तसा एखादा ग्रुपही सापडला नाही. याच दरम्यान मी अनेक लेख लिहीत गेलो. कथा लिहिल्या. कविता केल्या. अनेक छोट्या छोट्या स्पर्धा जिंकल्या. पण, नाटक लिहिणं आणि करणं राहून गेलं ते कायमचंच.. असो.
नाटक लिहिण्यासाठी आता फक्त मला विषय पाहिजे होता. पण, काही केल्या मला सापडेना. अशातच एकदा दिल्लीला एका मुलीच्या बलात्काराचं प्रकरण प्रचंड तापलं. स्त्री-सुरक्षा आता संकटात आली होती. देशात वाढत्या बलात्कारांचं प्रमाण काही केल्या संपतच नव्हतं. आजही ते नाही संपलेलं. यातच मला विषय सापडला.. स्त्री- सुरक्षा!! आणि, यावर नाटक लिहायचंच असं मी ठरवलं.." - आदित्य कदम.