डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे थोर अर्थतज्ज्ञ होते. डॉ. आंबेडकर अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी आर्थिक विषयावरील शेकडो ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात शासनाला वेळोवेळी सादर केलेल्या निवेदनातून तसेच अनेक आयोगापुढे त्यांनी दिलेल्या साक्षीतून भारतीय अर्थकारणाच्या समस्यांबाबतचा त्यांचा अभ्यास आणि ज्ञान दिसून येते. त्यांची भाषणे आर्थिक विचारांनी ओतप्रोत भरलेली आहेत. अस्पृष्यता आणि जातिव्यवस्थेच्या आर्थिक पैलूवर प्रकाश टाकणारे देशातील ते पहिले अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक आणि वित्तीय तरतुदींचा अंतर्भाव करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. डॉ. आंबेडकरांनी शेतीशी निगडित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे यावर भर दिला होता. शेतीचे राष्ट्रीयीकरणातून आर्थिक गुलामगिरी नष्ट होऊन आर्थिक दृष्ट्या कल्याणकारी राज्य निर्मितीस मदत होईल. सामुदायिक शेतीचा प्रयोग प्रत्यक्षात आणला तर शेतीक्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल. श्रमिक आणि शेतमजूर यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होऊन त्यांचा आर्थिक विकास होईल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिक सुदृढता प्राप्त होईल. वरील सर्व विचार महत्त्वाचे असून देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश पाडणारे आहेत.