नव्या वाटांवरुन जाताना अनेकदा मन साशंक असते की ही नवी वाट प्रगतीची नवी दिशा दाखवेल ना? मार्ग सुकर असेल ना? आपला प्रवास सुखाचा आणि सुखरुप होईल ना? सोबतीला कुणी सापडेल की हा मार्ग आपल्याला अगदी एकट्यालाच पार पाडत नंतर येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक बनवावा लागेल?
अशा अनेक विचारांच्या गदारोळात कधी स्वेच्छेने तर कधी त्याप्रसंगी इतर काही उपाय सापडला नाही म्हणून आपण त्यावेळी योग्य वाटलेल्या आयुष्य जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा निवडतो.
'बदल ही एकच गोष्ट जगात शाश्वत आहे' हे मान्य असलेल्या आपल्यातील काही जणांचा हा वेगळया वाटेचा प्रवास अधिक समाधानाचा पाहिला की त्यांनी त्यांच्या कृतीतून दिलेले विचार काळानुरुप जास्त अनुरुप आहेत असे पटायला लागते व त्यांचे अनुसरण करायला प्रेरित करते.
माणसाला माणुसकीने वागवायला लावणाऱ्या रुढी,प्रथा,परंपरा,विचार मग निश्चीतच जुने असो वा नवे किंवा त्यांचा संगम प्रसंगी जे अधिक योग्य असेल त्याचा स्वीकार करून आपण अधिक आनंदी समाज घडवत जातो.