जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडली आहे. शिवकाळाचे लिखित साधन म्हणजे शिवचरित्र व या चरित्रापासून प्रेरणा घेऊन कितीतरी महान लोक घडले व देशास घडवले. शिवकाळाचा अभ्यास करावयाचा म्हटला तर एक जन्मही पुरणे अशक्य आहे कारण याकाळाचे महत्व अथांग आहे आणि यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी नवे शिकवतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर भारतीय व विदेशी लेखकांनी विपुल लिखाण करण्याचा प्रयत्न केला तरीही आजही शिवकाळावर नव्याने लिखाण होतंच असते. या पुस्तकात शिवकाळातील परिचित व अपरिचित अशा प्रेरक प्रसंगाचा वेध घेण्यात आला आहे जे इतिहास अभ्यासकांना पूर्णपणे अपरिचित नसले तरी इतिहासाची आवड असणाऱ्या वाचकांच्या वाचनात फारसे येत नाहीत. या पुस्तकातील कथा वाचून वाचकांस ज्ञान व प्रेरणा मिळावी हाच उद्देश असून शिवचरित्राची ओढ असलेल्या वाचकांस हा प्रयत्न नक्की आवडेल अशी खात्री आहे.