तसं माझ्या आयुष्याची रचना पूर्णपणे या पुस्तकाप्रमाणे नसली तरी तशी थोडीफार जुळत असेलही. पुस्तक वाचून तसे तुम्हांला अनेक प्रश्न पडतील ही की नक्की हे कुणासाठी, कशासाठी ? तर असं काहीही नाही...आयुष्यात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे येतो, कधी आपला होऊन बसतो, कधी कारण संपलं की निघूनही जातो तर कधी असून नसल्यासारखा ही जगताना दिसतो. मात्र त्यातला प्रत्येक जण काही न काहीतरी आपल्याला शिकवून जातोच.
अशी अनेक माणसं मलाही भेटली प्रत्येक ठिकाणी ! काही अजूनही सोबत आहेत, काही सोडूनही गेली तर काही खास ही बनली. आता प्रत्येकाचं राहणं किंवा जाणं हे आपल्या हातात तर नाही.
अनेकदा आपल्या मनात एखाद्याला सांगण्यासाठी खूप काही असतं मात्र कुठंतरी आपण घाबरत बसतो. त्या व्यक्ती समोर लगेच बोलता येत नाही, शांत होऊन जातो, कसं बोलावं याचा विचार करत बसतो. आणि सरतेशेवटी आपण आपल्यातच त्या गोष्टी साठवून बसतो आणि मग राहतो तो फक्त विचार.
तसे प्रत्येकाचे कसले ना कसले तरी विचार हे असतातच, प्रत्येकजण त्यात कधीतरी गुंतलेला असतोच. काहीजण त्यात पार डूबतात तर काही लाटांवरच आपली नौका फिरवत बसतात. सांगायचं झालंच तर आपल्या मनातल्या विचारांचा आपण आयुष्य जगताना किती विचार करत बसतो यावर बहुतेक वेळा आपण आपले आयुष्य कसे जगतोय याचे उत्तर अवलंबून असते.
असेच काहीसे विचार, काहीश्या घडलेल्या गोष्टी, काहीसे काल्पनिक शब्द, काहीसे काल्पनिक क्षण...या पुस्तकातून मांडण्याचा हा एक प्रयत्न ! मनात साठवून ठेवण्यापेक्षा ते कागदावर उतरवलेलं बरं का नाही. थोडंस आगळंवेगळं काहीतरी व्यक्त केलेलं हे निशब्द...!