'अंधारयात्री' या कथासंग्रहात एकंदर वीस कथा असून त्यांत विषयांचं वैविध्य आहे. स्त्रियांच्या मनोव्यथा व्यक्त करणाऱ्या शीर्षककथेबरोबरच काही गूढकथेच्या अंगाने जाणाऱ्या कथाही आहेत. समाजातील उपेक्षितांच्या व्यथा सांगणाऱ्या कथांबरोबरच वृद्धांची दुःखं मांडणाऱ्या कथाही आहेत. आजी-नातवाचं अनोखं नातं, शारीरिक व्यंगातून निर्माण होणाऱ्या समस्या, गरीबांची उपेक्षा, आजारपणाने जीवनात होणारी उलथा-पालथ अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा ह्या संग्रहात आहेत. दोन विनोदी कथासंग्रहांनंतर आलेल्या सामाजिक विषयांवरच्या ह्या कथासंग्रहातील कथाही तितक्याच सशक्त आहेत. वाचकांच्या पसंतीला ह्या कथाही उतरतील असा विश्वास वाटतो. मानवी मनोव्यापार नीट जाणून घेऊन ह्या कथा लिहिल्या आहेत. त्यामुळे ह्या कथाही वाचकांच्या हृदयाचा ठाव निश्चितच घेतील.
संवादात्मक, प्रासादीक आणि ओघवती भाषा, उत्कंठावर्धक कथानक, निरीक्षणातून आलेली वेधकता ही ह्या कथांची वैशिष्ट्ये आहेत. मराठी कथाविश्वात ह्या कथा आपला वेगळा ठसा उमटवतील यात शंका नाही.