"नाटक लिहिणं ही माझी कित्येक वर्षापासूनची इच्छा. तसं मी माझ्या शालेय जीवनात अनेक छोट्या-छोट्या कार्यक्रमात सहज सहभागी होत असायचो. कवितावाचन, वक्तृत्व स्पर्धा असो, की छोट्या नाटिका असो.. सर्व स्पर्धेत मी हिरीरीने सहभागी होत असायचो. पण, पुढे कॉलेजात गेल्यावर मला कधीच एकांकिका/नाटक करणं जमलं नाही किंवा तसा एखादा ग्रुपही सापडला नाही. याच दरम्यान मी अनेक लेख लिहीत गेलो. कथा लिहिल्या. कविता केल्या. अनेक छोट्या छोट्या स्पर्धा जिंकल्या. पण, नाटक लिहिणं आणि करणं राहून गेलं ते कायमचंच.. असो.
मला एक लेखक आणि कवी म्हणून खऱ्या अर्थानं प्रसिद्धी दिली, ती "झी मराठी" या वाहिनीने. २०१७ -१८ मध्ये झी मराठीच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी एक लेख पाठवायची संधी चालून आली. आणि, त्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. मी फार लवकरच तो लेख झी मराठीच्या ई-मेल आयडी वर पाठवला. त्याचा फायदा असा झाला की, त्या अंकात ज्या ज्या लेखकांनी कथा पाठवली त्या त्या सर्व लेखकांची नावं छापून आली. त्यात, माझंही नाव होतं. मला खूपच आनंद झाला. लिखाणाला एक वेगळा हुरूप आला. मग काय, झी मराठीच्या प्रत्येक दिवाळी अंकांत मी माझे लेख हमखास पाठवले. पुढे, झी मराठी वाहिनीने "झी मराठी दिशा" नावाचं साप्ताहिक सुरू करत माझ्या सर्व कवितांना एक नवी संजीवनी, नवी ओळख मिळवून दिली.
एकीकडे माझ्या कविता, लेख "झी मराठी दिशा" मध्ये छापून येत होत्या. तर, दुसरीकडे एक लेखक/कवी म्हणून मला कंपनीत मान मिळत होता. याच दरम्यान मला कंपनीकडून एका छोटी नाटिका करण्याची संधी चालून आली. आणि, मी ती नाटिका केली. आमच्या त्या नाटिकाला प्रथम पारितोषिक मिळालं. त्यादिवशी खरंतर मला खूपच आनंद झाला होता. आता डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय होतं .. नाटक लिहायचं!!
नाटक लिहिण्यासाठी आता फक्त मला विषय पाहिजे होता. पण, काही केल्या मला सापडेना. अशातच एकदा दिल्लीला एका मुलीच्या बलात्काराचं प्रकरण प्रचंड तापलं. स्त्री-सुरक्षा आता संकटात आली होती. देशात वाढत्या बलात्कारांचं प्रमाण काही केल्या संपतच नव्हतं. आजही ते नाही संपलेलं. यातच मला विषय सापडला.. स्त्री- सुरक्षा!! आणि, यावर नाटक लिहायचंच असं मी ठरवलं.." - आदित्य कदम.
मूळचे कोकणातले असलेले आदित्य कदम यांचे आतापर्यंत दोनहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. नाटक लिहिणं आणि सदर करणं हे कायमचंच त्यांचं स्वप्न राहिलेलं आहे.
डायल१०० हा त्यांचा एक नाटककार म्हणून पहिलाच अनुभव.
आदित्य कदम यांनी यापूर्वी 'फाईडिंग खड्डा' या एकांकिकेत काम केले आहे.
संपर्क: ८१०८०९०५३८.
ईमेल : adityakadma85@gmail.com