सध्याचे माहिती तंत्रज्ञानाचे जग हे खूप बदलते जग आहे. कोणतीही गोष्ट स्थिर अशी नाही. पण या अस्थिर अशा जगात आपल्याला इंटरनेट मात्र स्थिर आणि सारखे हवे असते; किंबहुना इंटरनेटची गरज भासते.
अगदी छोटासा मेसेज पाठ्वण्यापासून तर विमानाचे तिकीट बुक करण्यापर्यंत सर्व कामे इंटरनेटच्या माध्यमातून करावी लागतात. मेसेज पाठवणे, कामाचे ईमेल करणे, फोटो शेयर करणे, व्हिडीओ पाहणे, गाणे ऐकणे, पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचणे, पैसे काढणे, पैसे पाठवणे, खरेदी करणे अशा अनेक आणि असंख्य कामांसाठी आपण इंटरनेट वापरत असतो, तेही घरबसल्या!
आता जर आपण इंटरनेटचा एवढा अफाट वापर करतो, तर त्यासोबत धोके हे असणारच. इंटरनेटवर फुटाफुटावर सायबर धोके आ वासून उभे असतात. त्या धोक्यांना घाबरून आपण इंटरनेट वापरणे किंवा इंटरनेटवरील कामे थांबवू शकत नाही. त्या ऐवजी आपल्याला गरज आहे, ती काळजी घेण्याची! म्हणजेच सायबर सुरक्षिततेची.
वाढत्या धोक्यांसोबत आपल्याला गरज आहे ती सायबर साक्षर होण्याची!