आपली महाराष्ट्रभूमी म्हणजे निर्मात्याने विशेष लक्ष देऊन निर्माण केलेले आनंदवनभुवन. या महाराष्ट्रास वैभवशाली इतिहासाचा, भूगोलाचा, संस्कृतीचा, साहित्याचा व स्थापत्याचा उज्वल वारसा आहे. पर्यटनस्थळांची तर आपल्याककडे एवढी विपुलता आहे की सर्व पर्यटनस्थळे पाहायचा संकल्प केल्यास एक जन्मही पुरणार नाही. आपल्याकडे जी विपुल पर्यटनस्थळे आहेत त्यामध्ये किल्ले, मंदिरे, लेणी, समुद्र, डोंगर, ऐतिहासिक, नैसर्गिक असे अनेक प्रकार येत असले तरी त्याहून वेगळे दोन प्रकार म्हणजे परिचित पर्यटनस्थळे व अपरिचित पर्यटनस्थळे आणि आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात अशी अपरिचित पर्यटनस्थळे विपुल प्रमाणात आहेत ज्यांचा परिचय हवा तेवढा झाला नाही कारण मुळात ही स्थळे रुळलेल्या वाटांवर नसून आडवाटांवर आहेत. आडवाटेवरील ही स्थळे पर्यटनस्थळे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची व संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारी ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वारसास्थळे आहेत व व ती पाहण्यासाठी रुळलेल्या वाटा सोडून आडवाटांचा प्रवास करणे भाग आहे.