‘शबरीची बोरं’ या कथासंग्रहात एकंदर तेवीस कथा आहेत. मध्यमवर्गीय किंवा क्वचित गरीब कुटुंबातले विविध सामाजिक प्रश्न, त्यांची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न, विविध प्रसंगांमुळे झालेली किंचित विनोदनिर्मिती, गूढकथांच्या अंगाने गेलेल्या एक-दोन कथा, कधी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात व्यत्यय आल्यामुळे निर्माण झालेले विचित्र प्रसंग आणि त्यातून नाते संबंधात निर्माण झालेले ताण - तणाव, क्वचित बिघडत गेलेले नातेसंबंध, कधी प्रेमळ नात्यांची घट्ट वीण, तर कधी संकटांतून मार्ग शोधत असताना सापडलेल्या नव्या पाऊलवाटा अशा विविध प्रसंगांवर, व्यक्तींवर बेतलेल्या या कथा विविधरंगी आहेत. विविधढंगी आहेत.
२०१५ पासून विविध दिवाळी अंकांतून आणि इतर अंकांतून वेळोवेळी प्रकाशित झालेल्या या कथा आजही ताज्या-टवटवीत वाटतात. साधी- सोपी- प्रवाही भाषा, संवादात्मकतेतून निर्माण झालेलं नाट्यपूर्ण वातावरण, माणसांनी एकमेकांवर केलेलं प्रेम, एकमेकांचा केलेला द्वेश, एकमेकांसाठी केलेला त्याग, हेवे-दावे, त्यातून दुखावलेली मनं, संकटांशी दोन हात करताना सापडलेली साधी-सोपी उत्तरं, विविध भाव-भावना, कल्पना, एकमेकाना मदत करण्याची वृत्ती असं या कथांचं एकंदर स्वरूप आहे. कथानकांचं वेगळेपण, सर्व वयोगटातल्या व्यक्तिरेखांचे उत्कट भावाविष्कार यांमुळे कथा अत्यंत वाचनीय झाल्या आहेत. वाचकाना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य या कथांमधे निश्चितच आहे. लेखिकेच्या यापूर्वीच्या पुस्तकांप्रमाणे हा कथासंग्रहही वाचकाना आवडेल अशी खात्री वाटते.