जनरेशन झी म्हणजे १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी. आज शाळा कॉलेजात असणाऱ्या या मुलांना इतर पिढ्यांपेक्षा कितीतरी पट जास्त सुख मिळालंय असं आपण सहज म्हणून जातो. सुखाच्या पावसात तृप्त असायला हवं ना मग या मुलांनी? सत्य वेगळं आहे. घुसमटणारी, कोंडमारा सहन करणारी अगदी आत्महत्यचं टोक गाठणारीदेखील हीच मुलं आहेत. कुणी म्हणेल की या पिढीला सुख टोचतंय! पण खरं हेच आहे की बदलत्या कुटुंब व्यवस्थेला सामोरं जाताना हडबडून गेली आहेत ही मुलं. त्यांना समजून घेण्याचा फिक्शनल प्रयत्न म्हणजे 'जनरेशन झी सिरीज'. एस्केपिझम हे या मालिकेतलं पाहिलं पुस्तक.
न्यूज चॅनेलमध्ये नोकरी करणाऱ्या आई वडिलांची मुलगी मिहिका अचानक घरातून पळून जाते. पळून जाण्यासाठी तिची लहान बहिण देविका तिला मदत करते. अगदी तिची ही सगळी गुपितं गुपितंच ठेवण्यापर्यंत सगळी. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण पुढे काय ? मिहिकाशिवाय जगणं? देविकाला आता करमेना! आपल्या बहिणीला शोधून पुन्हा घरी आणायचा ती निश्चय करते. सारा पोरखेळच तो! पण जसा ती बहिणीचा ठावठिकाणा शोधू लागते तस तसं मोठं भयावह सत्य समोर येतं. सत्य कसलं असत्यच सारं. तिचं आख्खं कुटूंब बुचकळ्यात पडलंय. का पळून गेली आहे मिहिका? आणि कुठे पळून गेलीये? आता फक्त देविकाच शोधून काढू शकते तिला. पण कशी?
वाचूया, जनरेशन झीला समजून घेताना वाचायलाच हवी अशी कथा.