धम्मक्रांतीच्या प्रेरणेने अस्तित्वात आलेल्या आंबेडकरी साहित्याने वैश्विक साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. नव्या जाणिवा, नवा आशय आणि नवे मूल्यभान असणाऱ्या या साहित्याने काळावर अमीट असा ठसा उमटविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केलेला सांस्कृतिक संघर्ष आंबेडकरी प्रतिभावंतांनी टोकदार केला. मूल्याधिष्ठित, स्वतंत्र आणि समतामय समाज निर्मितीसाठी आंबेडकरी कवींनी पुकारलेला एल्गार अद्वितीय होता. विषम व्यवस्थेवर प्रश्नांचे खोलवर ओरखडे उमटविणारी आंबेडकरी कविता भेदक होती, मनुष्यत्वाच्या उत्कर्षासाठी आणि पर्यायी संस्कृतीसाठी आग्रही होती. कवी संदेश ढोले यांची कविता सुद्धा याला अपवाद नाही.
समकाळ अनंत विषाक्त समस्यांनी ग्रस्त आहे. अंधारयुगाचे पुरस्कर्ते हा अंधार अधिकाधिक गडद करण्यासाठी बौद्धिकं घेत आहेत. माणूस उद्ध्वस्त करणाऱ्या नवनवीन योजनांना ते जन्म देत आहेत. अशावेळी उजेडावर प्रेम करणारी माणसं हतबल असली तरी निराश मात्र नाहीत. या मनुष्यद्रोही काळाची संदेश ढोले गंभीर समीक्षा करतात. त्यांचे सहजसुंदर शब्द कविता होऊन आपल्याशी संवाद साधतात. ढोले यांची कविता बुद्धनिष्ठ आहे. बुद्धांनी सांगितलेल्या वैश्विक मानवी मूल्यांचा ही कविता पुरस्कार करते आणि सम्यक जाणिवांना अधोरेखित करते. जगाच्या पुनर्रचनेचे सूत्र ढोले यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. साहित्याच्या रणांगणात संदेश ढोले यांची तेजस्वी कविता स्वतंत्र ओळख निर्माण करेल याची खात्री आहे. त्यांच्या कवितीक जगण्याला मी मन:पूर्वक सदिच्छा देतो.
- उपराकार लक्ष्मण माने
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners