इतिहास म्हणजे केवळ एखादी घटना नव्हे तर एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू या सुद्धा इत{हासाचा एक अविभाज्य घटक आहेत व अशाच विविध ऐतिहासिक विषयांचा पुस्तकात वेध घेण्यात आलेला आहे. जुन्या जाणत्या लेखकांनी लिखाणाच्या माध्यमातून सर्वांना आपल्या संस्कृतीची व इतिहासाची ओळख जगास करून दिली यामध्ये त्यांचा हेतू भावी पिढ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तृत व्हाव्यात हाच होता.
पाहता पाहता वर्षे लोटली व हा ज्ञानाचा प्रवाह आधुनिक युगात नव्या पिढीसमोर येण्यास अडचणी पडू लागल्या मात्र नदीला कितीही अडवले तरी शेवटी ती अथक प्रयत्नांती समुद्रास मिळतेच त्याप्रमाणे इतिहास सुद्धा काही काळ अज्ञात राहू शकतो मात्र शेवटी त्याचा प्रवाह पुढे जात राहणारच हा निसर्ग नियम आहे.
मागील पिंढ्यांतील लेखकांनी ज्या गोष्टी आपल्याला संदर्भरुपांतून अथवा ग्रंथरुपातून सांगितल्या आहेत त्या आपल्यासोबत इतरांनाही समजाव्यात असे जेव्हा जाणवते तेव्हा इतिहासावर काही तरी बोलण्याची इच्छा होते कारण इतिहास हा प्रवाही आहे व तो कायमच प्रवाही राहायला हवा.