महाभारताची अनेक रहस्ये या कथानकातच दडलेली आहेत. थोडेसे बारकाईने वाचले, एकमेकांशी जोडले तर याचे संदर्भ आपल्याला लागतात व यातील बऱ्याचश्या घटनांभोवती असलेले चमत्काराचे आवरण गळून पडते व आपल्याला अनेक रहस्यांचा उलगडा होतो. अशा अनेक रहस्यांतील काही रहस्ये “महाभारताचा रहस्यभेद” या माझ्या मालिकेद्वारे शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे. “कृष्णाख्यान” हे त्यापैकी पहिले पुस्तक. यात कृष्णाच्या आयुष्याकडे चिकित्सक वृत्तीने पहात, त्याच्या आयुष्यातील चमत्कार वगळून, त्याच्यातील महामानव शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
हरिवंश व महाभारताकडे आपण जर डोळसपणे पाहिले तर या महामानवाच्या मोठेपणाला कोणत्याही चमत्कारांची आवश्यकता नाही, हे आपल्या सहज लक्षात येऊ शकते आणि त्याच दृष्टिकोनातून हे कृष्णाख्यान लिहिले गेले आहे. येथे उलगडते ते मानवी कृष्णाचं संपूर्ण आयुष्य आणि आपल्यापुढे उभं राहातं ते महामानव कृष्णाचं एक आगळंवेगळं रूप. चाणाक्ष, हुशार, शूर, बुद्धिमान , धोरणी, राजकारणी महामानव कृष्ण.
कृष्णाचा जन्म जसा गूढ, तसा त्याचा मृत्यूदेखील. त्याला भगवानपदावर नेणाऱ्या असंख्य भक्तांनी मग त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटनेवर मग चमत्कारांची अनावश्यक पुटं चढविली. ही जर बाजूला काढली तर आपल्यासमोर उभा राहतो तो महामानव कृष्ण. कृष्णावर प्रेम करणाऱ्या असंख्य कृष्णप्रेमींना त्याचं हे मानवी स्वरूप नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.