माझ्या बँकेचा हत्येकरी कोण?
ज्याला देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम कणा म्हणतात, त्याच भारतीय बँकिंग क्षेत्रातील अनेक बँका अलीकडच्या काळात अशा अचानक एकापाठोपाठ एक भुईसपाट होत असल्याच्या विदारक घटना सर्वानाच बुचकळ्यात टाकणार्या असून, हे असे का घडले याचेही सखेद आश्चर्य वाटते.
उत्तम व्यवस्थापन, शिस्तबध्द प्रशासन आणि नियामकांच्या सगळ्या अटींचे काटेकोरपणे पालन करून भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार्या बँकांपैकी काही बँकांच्या नशिबी दिवाळखोरीची लाचारी नेमकी कुणामुळे आणि कशामुळे आली असावी असाही एक प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो.
‘माझ्या बँकेचा हत्येकरी कोण?’ हे पुस्तक विविध बँकांमध्ये सर्वोच्च प्रमुखपदांवर (अर्थात C-Suite) काम केलेल्या एका तज्ज्ञ अधिकार्याने लिहिले असून, बँकांतर्गत व्यवहारांची संपूर्ण तपशीलवार आणि अचूक माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांसमोर सादर केली आहे. या जाणकार अधिकार्याने काही बँकांमध्ये चाललेल्या आर्थिक गैरव्यवहारांची अनेक प्रकरणे उघड केली असून ग्राहकांनाही वेळीच सावध करण्यासाठी काही मौलिक सल्ले देतानाच, अतिशय वेगळया धाटणीचा मार्गदर्शक गुणतक्ता वाचकांसमोर ठेवला आहे.
अलीकडेच उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या अनेक मोठया घटनांनी देशातील अवघे बँकिंग क्षेत्र पुरते हादरले असताना आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम निरपराध ग्राहकांना भोगावे लागले असतानाच, ज्यांच्या भावी सुखस्वप्नांचे आशा आकांक्षांचे जे अपरिमित नुकसान झाले होते, अशा हजारो खातेदारांच्या व्यथांचे प्रतिनिधित्व करणारे हे पुस्तक आहे.