"प्रितीत तुझ्या" ह्या पुस्तकाची कवयित्री पूर्वा कदम हि फक्त कवयित्री नसून नर्तकी पण आहे. लोकांना आपल्या कलेचे प्रदर्शन करून आपले विचार व्यक्त करणे हि तिची आवड आहे. त्याच कलेचे प्रदर्शन करताना हे पुस्तक लिहिणे हा तिने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे...
तिच्या भावंडावर तिचा खूप जीव आहे आणि म्हणून शालेय वयात पहिल्यांदा तिने तिची पहिली कविता त्यांच्या काही आठवणी सांगत, वर्षाच्या पहिल्या पावसाच्या साक्षीने तिच्या बहिणी सोबतच्या दुराव्यात लिहिली. मग हळूहळू कधी कविता लिखाणाची आवड जडली हे तिला कळलेचं नाही. बऱ्याच कविता लिहून त्यात काय विशेष, अश्या अविर्भावाने त्या कधी जपून ठेवल्याचं नाही...
जसे-जसे वय वाढत गेले, इंटरनेट व प्रामुख्याने "व्हाट्स अँप" सोबत नाते जोडले गेले, सकाळी येणाऱ्या मेसेजेस् मधील कविता वाचल्यावर मनात इच्छा झाली कि आपणही असे काही तरी करावे व सर्वांना स्वतःचे नाव लिहून पाठवावे. पण म्हणतात ना, मनात आले तरी जो पर्यंत सुरुवात होत नाही तो पर्यंत काही उपयोग नाही ....
कोरोना चा जिवाणू जसा-जसा वाढत गेला तसे-तसे महाराष्ट्रात सर्व व्यवहार ठप्प झाले, पण तिचे नाते तिच्या मनाशी अशे जोडले गेले कि तिला ह्या कोरोनाच्या गंभीर काळात न जमणारी कविता लेखनाची आवड जोपासता आली....
तिने हि आवड नुसती जोपासली नाही तर सर्वांना त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी एका पुस्तका द्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
ती तिच्या आजोबांचा, म्हणजे कै. वसंतराव कदम ह्यांचा, एक अनुभव येथे नमूद करते कि, ती तिच्या आजोबांशी बोलत असे व ते तिला नेहमी सल्ला देत असे कि कविता ठरवून किंवा कोणी सांगितली तेव्हाचं लिहिली जात नाही तर कविता म्हणजे न ठरवता मनातील विचार शब्द फुलांद्वारे व्यक्त केली जाते. कविता म्हणजे, कधी आनंदी असताना, तर कधी दुखी असताना आपले विचार, शब्दफुलांद्वारे विविध अलंकारांचा वापर करून मांडणे होय...
कै. वसंतराव कदम उत्तम कविता आणि लेख लिहायचे म्हणूनच कि काय कोण जाणे पूर्वाची पण ह्याच कले कडे रुची वाढली असावी.
कॉलेज मध्ये शिकतांना तिची एक कविता कॉलेजच्या मासिकात प्रकाशित झाली. एखाद्या लहान मुलाला जसे प्रोत्साहन दिले कि तो काहीतरी करून दाखवायच्या मागे असतो तसे तिला ही कॉलेजने दिलेल्या संधी द्वारे प्रेरित होऊन तिने हे पुस्तक लिहिण्याचे पाऊल उचलले.
पूर्वा नेहमीच ह्या मताशी ठाम राहिली कि 'कविता ह्या मनातल्या भावना व्यक्त करतात. काल्पनिक असो किंवा सत्य, पण जो पर्यंत आपण त्या विषयाकडे मनाचा भावनिक दृष्टीने बघत नाही तोपर्यंत ती कविता कोणत्याही मनाशी जोडू शकणार नाही, त्या कवितेतल्या भावना, शब्द व त्या शब्दांचे अर्थ कोणत्याही मनांना जाणवू शकणार नाहीत, समजू शकणार नाही आणि म्हणूनच ती ज्या पण कविता लिहते त्यात ती मनात उमटणाऱ्या भावना उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न करते.