इसवी सन ८०० च्या सुमारास राष्ट्रकूट राजांनी कोकण प्रांताचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी प्रथम कपर्दी याला कोकणचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले. इसवी सन १२६० पर्यंत श्रीस्थानक या राजधानीतून साडे-चारशे वर्षे शिलाहार राजांनी या प्रदेशावर राज्य केले.
कान्हेरी येथील कोरीव लेखांतून दिसणारे प्रथम कपर्दी, पुल्लशक्ती आणि द्वितीय कपर्दी, आपल्याच स्वकीयांकडून दुर्लक्षिला गेलेला छद्वैदेव, श्रीस्थानकास राजधानीचा दर्जा देणारा पराक्रमी अपराजित, ज्याचा ताम्रपट सर्वप्रथम ठाण्याच्या किल्ल्यात सापडला आणि शिलाहारांच्या इतिहासाला सुरुवात झाली तो अरीकेसरी, पाटपल्ली म्हणजेच आजचे अंबरनाथ येथे शिव मंदिराचे स्वप्न बघणारा छित्तराज आणि ते प्रत्यक्षात पूर्णत्वास नेणारा त्याचा भाऊ मुम्मुणी, राज्यकारभारात दक्ष असणारी राजमाता पद्मलदेवी आणि यादवांकडून सागरी युद्धात मारला गेलेला शेवटचा सोमेश्वर असे तब्बल पंचवीस श्रीस्थानकाचे राजे आज आपण पूर्णपणे विसरलो आहोत.
इसवी सन २००० पासून आजतागायत श्रीस्थानकाच्या शिलाहारांचे सहा नवीन ताम्रपट तसेच शिलालेख सापडले आहेत. रुपाली मोकाशी यांनी नवीन पुराभिलेखांचा अभ्यास आणि उपलब्ध असलेल्या पुराभिलेखांचे समग्र विश्लेषण या माध्यमातून श्रीस्थानकाच्या शिलाहारांचा इतिहास मांडला आहे.
श्रीस्थानकाच्या शिलाहार राजवंशाची सुधारित कालगणना हे या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. यातूनच महाकुमार केशीदेव या नवीन शासकाची माहिती मिळते. अल्पपरिचित झंझ तसेच दक्षिण कोकणातील चालुक्य राजा केदारदेव यांचाही उहापोह त्यांनी केला आहे. श्रीस्थानकाच्या शिलाहारांची सत्ता समाप्त झाल्यावर पोर्तुगीज सत्ता पाय रोवून उभी राहीपर्यंतचा घडून आलेला बदल कोरीव लेखांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आला आहे.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners