“गावगाड्यातले माईलस्टोन” या माझ्या पहिल्या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. फेसबुकवरच्या वाचकांनी या पुस्तकाला भरभरून दाद दिली. खेड्यापाड्यातील कितीतरी लोकांनी आपल्या डोळ्यातील अश्रू ढाळत या पुस्तकाचे तोंड भरून कौतुक केले. या पुस्तकानंतरचा “गावानं केलंय मातीतून लॉगआऊट” हा माझा दुसरा कथासंग्रह.
विकासाच्या नावाखाली शहराच्या रस्त्याला गाव जोडलं गेल्यानं त्याचा झालेला परिणाम यातील बऱ्याच कथातून तुम्हांला दिसून येईल. खेड्यात राहताना लहानपणापासूनच आजूबाजूची परिस्थिती, तिथली माणसं, तिथला त्यांचा चाललेला मातीतील संघर्ष या गोष्टी आपोआप मनात घर करून बसल्या आहेत. पुढे जसजसं वाचन वाढत गेलं तसं लिखाणही आपोआप गवसत गेलं. आणि इतकी वर्षे मनाच्या कुशीत लपलेली पात्रं बाहेर येण्यासाठी उत्सुक झाली. ही सर्व पात्रं आज कथास्वरूपात तुमच्या स्वाधीन करीत आहे, त्यांचा तुम्ही स्वीकार कराल अशी आशा आहे.