स्टेट बँकेसारख्या सेवा उद्योगात चाळीस वर्षे काम केल्याने जनसंपर्क खूप प्राप्त झाला. चांगलं लिखाण वाचायची सवय लहानपणापासून होती. पण काही लिहावे यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये वेळ मिळू शकला नाही. लिहिण्याची आवड सेवानिवृत्तीनंतर जोपासू शकलो. समाजात वावरताना व्यक्ती, वृत्ती, प्रवृत्ती, स्वभावातील गुणदोष जवळून अनुभवायला मिळाले. वयाची साठ वर्ष पार केल्यामुळे नाती, आपसी संबंध, वागण्या बोलण्यातील गुणदोष अशा चांगल्या वाईट गोष्टींचे अनुभव गाठीशी होतेच. ह्या सर्व गोष्टींना शब्दरूप द्यावे अशी प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. त्यानुसार काही ललित लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. समाज माध्यमांमध्ये लेखांना बरीच लोकप्रियता मिळत गेली. "सहज सुचलं म्हणून" लेख संग्रहातील ललित लेख हे वेगवेगळ्या विषयावर आहेत, काही पौराणिक मान्यतेवर आधारित आहेत आणि मोजक्या कथा पण समाविष्ट केल्या आहेत. वाचकांना काही लेख गंभीर करतील, काही लेख माहितीपूर्ण आढळतील. थोडक्यात एकाच पुस्तकात वाचकांना विविधांगी विषय वाचावयास मिळतील अशी अपेक्षा आहे. आपण त्याचा आनंदाने स्वीकार कराल याची कुठेतरी निश्चित खात्री वाटते. धन्यवाद.