अर्थ, आशय, तत्त्वज्ञान आणि तर्क या चार चतु:सूत्रीचा उपयोग करून 'आंबेडकरवादी कविता आकलन व अर्थमीमांसा' या समीक्षाग्रंथात पाच पुरोगामी कवी आणि त्यांच्या कवितांची समीक्षा, कवितांचे वर्णन, विश्लेषण आणि मूल्यमापन करण्यात आले आहे. समाजातील वंचित घटकांचे वैचारिक उद्बोधन, प्रबोधन व्हावे असा मानस या ग्रंथनिर्मितीमागे आहे. मराठी साहित्यातील समीक्षाप्रांत या ग्रंथाने अधिक समृद्ध व्हावा, असाही साहित्यविषयक दृष्टिकोन या सृजनशील मूल्यमापनामागे आहे. मराठी कविता आणि सर्वच साहित्यप्रकारांची प्रचारकी नव्हे तर सखोल समीक्षा करण्याची वहिवाट या ग्रंथातून विकसित व्हावी, असाही उघड उद्देश या निर्मितीमागे आहे. समाजाची साहित्याशी, साहित्याची समाजाशी असलेली नाळ निश्चितच या नवनिर्मितीतून जुळून राहणार आहे. समाज आणि साहित्याची फारकत 'समाज आणि साहित्य' या दोहोंचीही हानी करते. दर्जेदार कलाकृती समाजाला साहित्याशी सतत बांधून ठेवत असतात. 'आंबेडकरवादी कविता आकलन व अर्थमीमांसा' या समीक्षा ग्रंथातील पाचही कलाकृती दर्जेदार आहेत. रसिक वाचकांची वाङ्मयीन अभिरुची निश्चितच हा ग्रंथ उंचावणार, यात शंका नाही. मराठी साहित्यविश्वाला अधिक जबाबदारीने पुरोगामी साहित्यनिर्मिती करण्याची प्रेरणा या ग्रंथातून नक्कीच मिळेल, अशी आशा व्यक्त केली तर ते वावगे होणार नाही. काव्यरसिक व वाचकांना प्रस्तुत ग्रंथातील 'कविता व कवितांची अर्थमीमांसा' आवडेल, असे धाडसी मत शेवटी व्यक्त केले तर ते अतिशयोक्त होणार नाही.
- संदेश ढोले
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners